भुसावळ : पोलीस अधिकार्याने पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरात आणला जातो आणि काही वेळाने राजकीय वरदहस्त असलेला वाळूमाफिया तो ट्रकच पळवून नेतो.. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना शनिवारी रात्री भुसावळात घडली. या घटनेसोबतच गुन्हेगारांवर असलेला पोलिसांचा उरला-सुरला धाकही संपला असून पोलीस दलाची अब्रूच वेशीवर टांगली गेली आहे.
आता या घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी पोलीस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळातील बाजारपेठ ठाण्याच्या एका अधिकार्याने रविवारी मध्यरात्री गस्तीदरम्यान वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.१९ झेड.५0४0) पकडला.
संबंधिताकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याने हाट्रक बाजारपेठपोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला. यानंतर राजकीय चक्रे फिरू लागली. मोठा वरदहस्त असलेल्या वाळूमाफियाने फौजदाराशीच अरेरावी करीत पोलीस ठाण्याच्या आवारातून चक्क जप्त केलेला ट्रकच पळवून नेला. रविवारी पहाटे पहाटे हा प्रकार घडला.
ट्रक लांबवल्याबाबत पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाशिक येथे बंदोबस्तावर असल्याचे सांगण्यात आले. फौजदार आशिष शेळके यांच्याशी वारंवार संपर्कसाधल्यानंतर त्यांनी कामात आहे, नंतर बोलतो, असे सांगून भ्रमणध्वनी कट केला, तर पोलीस निरीक्षक सतीश देशमुख रजेवर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
- या ट्रक चोरीप्रकरणी रात्री उशिरा बापूभाऊ बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन गणेश पंडित सोनवणे (१९, रा.खेडी, आव्हाणे, ता.जळगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाच लाख सात हजारांच्या ट्रकसह वाळू लांबवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- कठोर कारवाईचे आदेश
वाळूची अवैधरीत्या वाहतूक वा चोरी होत असल्यास महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रशासनाला जणू विसर पडला आहे.
- जिल्ह्यातील गिरणा पात्रातून राजरोस वाळूची वाहतूक सुरू आहे. सूर्यास्तानंतर वाळू वाहतूक करता येत नाही. मात्रअसे असतानाही राष्ट्रीय महामार्गावरून अहोरात्र वाळूचे शेकडो ट्रक वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. आर्थिक-देवाण घेवाणीमुळे प्रशासनाने चुप्पी साधली आहे की काय?असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रशासनाची सोयीस्कर चुप्पी !