तन्मय दाते
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील देवराईमध्ये असलेल्या एका रक्तचंदनाच्या झाडाची किंमत तब्बल १०० कोटी एवढी आहे. तब्बल १५० वर्षे आयुष्यमान असलेले हे झाड असून, रत्नागिरी जिल्ह्यात हे झाड कसे आले, याची माहिती काेणालाच नाही. मात्र, या झाडाला आंतरराष्ट्रीय बाजारात माेठी मागणी असून, ५ ते ६ हजार रुपये किलाे इतका त्याचा दर आहे.
रक्तचंदन हे झाड विशेषत: तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळते. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, चीन आदी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. रक्तचंदनाचा उपयोग उच्च प्रतीची दारू, मूर्तिकलेचा वापर, तसेच आयुर्वेदामध्ये सूज किंवा मुका मार लागल्यास केला जातो.
या झाडाबाबत येथील ग्रामस्थ प्रकाश चाळके यांनी सांगितले की, साधारण ३० ते ४० वर्षांपूर्वी गावामध्ये कातभट्टीचा व्यवसाय चालायचा. बैल आजारी पडला की, कातकरी समाजातील लाेक या झाडाची साल उगाळून बैलाला देत हाेते. त्यानंतर हे बैल ठणठणीत बरे हाेत हाेते. हे झाड औषधी असल्याने ते ताेडायचे नाही, असा एकमुखी निर्णय झाला.
रात्रंदिवस खडा पहारा
पाच वर्षांपूर्वी या झाडाचा गर काढून संशाेधन करण्यात आले. त्यानंतर हे झाड रक्तचंदनाचे असल्याचे पुढे आले. ३० मीटर उंच, १७ ते १८ फूट एवढा घेरा असलेल्या या झाडाच्या सुरक्षेसाठी देवरूख वन विभागाने विशेष लक्ष दिले आहे.