MNS Sandeep Deshpande, Sanjay Raut: राज्याच्या राजकारणात दररोज काहीतरी नवीन गोष्ट घडल आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. मात्र आतापर्यंत गेली २५-३० वर्षे मुंबई पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत होता. आता त्या शिवसेनेचेच दोन भाग झाले असल्याने शिवसेनेसारखीच विचारसरणी असलेला मुंबईतील आक्रमक पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा मनसेही जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. मनसेचे सचिव, नेते संदीप देशपांडे हे मुंबईतील विविध मुद्द्यांवर आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. असे असतानाच, त्यांच्यावर काल हल्ला झाला आणि त्याचे राजकीय पडसाद उमटले. संदीप देशपांडे किंवा राज ठाकरेंनी कोणावरही प्रत्यक्षपणे टीका केली नाही. पण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी, या हल्ल्याप्रकरणी थेट आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करा, अशी मागणी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊतांना चॅलेंज दिले.
संजय राऊतांना ताब्यात घ्या असे म्हटल्यावर, राऊतांनी आधी प्रतिक्रिया दिली. "उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला असता, तर ते आठ-दहा दिवस कोमात गेले असते", अशी नेहमीप्रमाणे खोचक आणि आक्रमक विधान त्यांनी केले. त्यावर आता खोपकरांनी राऊतांनाच चॅलेंज दिले. "सर्वप्रथम मला राऊतांना शिमग्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आता मी त्यांना सांगतो की तुमच्यात एवढीच जर मस्ती असेल, तर तुमची सुरक्षा व्यवस्था बाजूला काढा. आम्हीदेखील आमची सुरक्षा व्यवस्था बाजूला करतो. त्यानंतर मग आपण शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू आणि तिथे आम्ही तुम्हाला तुमचे कपडे काढून पार्श्वभागावर फटके मारू," अशी अतिशय आक्रमक प्रतिक्रिया खोपकरांनी दिली.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी स्वत: हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यामुळे मी घाबरणार नाही. भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार. आम्ही कुणाला भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी म्हटलं. तर संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यातील गुन्हेगार तात्काळ सापडले पाहिजे. पोलिसांनी काम चोख करावं. हल्लेखोरांना अटक करणे आणि त्यांच्यमागे जे कुणी असतील त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. हे घडले त्याचा निषेध जेवढा करू तितका कमी आहे. मनसैनिक संतप्त आहेत. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असे होणे अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. कडक शासन झालेच पाहिजे असं मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटलं