ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आंतरराष्ट्रीय चित्र-शिल्पकार संदीप पिसाळकर यांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारा"ने गौरव करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते पिसाळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला विभागात संदीप पिसाळकर यांच्यासोबत संदेश भंडारे, प्रभाकर पाचपुते, शिशिर शिंदे आणि संजीव संकपाळ यांचाही नामांकन यादीत समावेश होता. मात्र संदीप पिसाळकर यांनी बाजी मारली असून त्यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारा"ने सन्मान करण्यात आला आहे.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
संदीप मधुकरराव पिसाळकर यांची माहिती
सामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय चित्र-शिल्पकार अशी विलक्षण झेप, शिवाय उदयोन्मुख कलाकारांचा ‘युवा’ मार्गदर्शक, बहुआयामी कलाकार असा चित्र-शिल्पकलेतील ‘प्रेरणादायी’ प्रवास. संदीप पिसाळकर मूळचे यवतमाळचे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथेच झाले. घरची परिस्थिती सर्वसामान्य, लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. या आवडीमुळेच त्यांनी चित्रकलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर अमरावती व नागपूर येथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर, मुंबई येथील विख्यात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून २००५ मध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी घेतली. २००६ मध्ये त्यांनी गुलबर्गा येथील एम.एम. के कॉलेजमधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी घेतली. २००८ मध्ये वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट ही पदवी घेतली. चित्रकलेबरोबर शिल्पकलेत त्यांनी मोठे काम केले आहे. चित्रकलेचे शिक्षण घेतानाच, त्यांनी विविध प्रदर्शनांत भाग घेतला आहे. ३० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांच्या कलाकृती गाजल्या आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, एम.एम.के. कॉलेज गुलबर्गा, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, जहांगीर आर्ट गॅलरी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, ग्रज्युएट स्टुडंट शो वडोदरा, बोधी आर्ट गॅलरी, वधेरा आर्ट गॅलरी दिल्ली, आर्ट गॅलरी मुंबई, रेलीगेर आर्ट गॅलरी नवी दिल्ली, अनंत आर्ट गॅलरी नवी दिल्ली, आर्ट गॅलरी नवी दिल्ली, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, रेड अर्थ गॅलरी वडोदरा, ओआयडी आर्ट गॅलरी कोची, बिर्ला अकॅडमी कोलकाता, श्राईन एम्पायर आर्ट गॅलरी नवी दिल्ली, एक्झिबिट ३२० गॅलरी नवी दिल्ली, फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट वडोदरा, एस्सल म्युझियम ऑस्ट्रिया, ‘खोज’शो नवी दिल्ली, वाडफेस्ट शो या ठिकाणी त्यांच्या कलाकृतींनी प्रदर्शने गाजविली आहेत, तसेच २००९ मध्ये अमेरिकेतील साराटोगा व २०१० मध्ये वधेरा आर्ट गॅलरी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृतींची सोलो प्रदर्शन झाली आहेत. पिसाळकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये २००३-०५ जे. जे. स्कूल ऑफ आर्ट प्रदर्शन, २००५-महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, २००६-आर्ट गॅलरी मुंबई, २००६-बॉम्बे आर्ट सोसायटी, २००८-कांस्य पदक, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, २००८-सुवर्ण पदक, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, २००८-बोधी आर्ट अवॉर्ड मुंबई, २००८-एफआयसीए-उदयोन्मुख कलाकार पुरस्कार नवी दिल्ली या पुरस्कारांचा समावेश आहे. संदीप यांनी वडोदरा, ग्वाल्हेर व शांतिनिकेतन येथे प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले आहे. देशातील अनेक नामांकित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा