मुंबई : विधानसभा निवडणुकीचे आकडे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा विरोधात मैदानात असलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा पराभव झाला आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देत ऐनवेळी राष्ट्रवादीकडून दत्ता गोर्डे यांनी उमेदवारी मिळवल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली असल्याचे पाहायला मिळत होते. तर जातीचे समीकरणांमुळे आणि नात्यागोत्याचे उमेदवारांना होणारी मदतीमुळे भुमरे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भुमरेंनी विरोधकांना धक्का देत विजय मिळवला आहे.
निकालाच्या सुरवातीपासूनच भुमरे यांनी लीड घेतली होती. एकूण 24 फेऱ्यांनंतर भुमरे यांना १४ हजार १३९ मतांनी विजय झाला आहे. तर पोस्टल मते अजूनही यात मिळवण्यात आली नाही. शेवटपर्यंत चुरशीची ठरलेल्या या लढतीत भुमरे यांनी बाजी मारली आहे. त्यांचा विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.