एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. याच दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipanrao Bhumre) यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार झालो नाही तर आमच्यामुळे ते खासदार झाले. राऊत आता उरलेली शिवसेना देखील संपवणार आहे. यांच्यामुळेच बंड झालं. या सर्व प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहे" अशी जोरदार टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे.
शिवसेनेत सध्या जे लोक शिल्लक आहेत. त्यातील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा देखील भूमरे यांनी केला आहे. "पंधरा दिवसांनंतर आम्ही आता घरी आलो आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो. आम्ही पैसा किंवा कोणत्या पदाच्या लालसेने गेलेलो नव्हतो. पैशांनी मी आयुष्यात कधीही महत्त्व दिलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक आम्हाला भेटू देत नव्हते. त्यामुळे आमचं काम होतं नव्हतं" असं म्हटलं आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला अडचणीत आणत होती. त्यामुळे आम्हाला हे बंड करावं लागलं. उद्धव ठाकरे हे आता रोज बैठका घेतात. सेनाभवनला जातात. त्यांनी हेच जर आधीच केलं असतं. तर आम्हाला भेट दिली असती, आमचे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती" असं देखील संदिपान भूमरे यांनी म्हटलं आहे. ते पंधरा दिवसांनंतर आपल्या घरी आले आहेत. TV9 मराठी या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण..."
"काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. याला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला" असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे.