राजू ओढे / ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता पथकाने रेतीच्या ट्रकचा बुधवारी रात्री सिनेस्टाइल पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याची चाहूल लागताच माणकोलीहून सुसाट निघालेला हा ट्रक पथकाने कसाबसा पथकाने अडवला. त्यानंतर, चक्क पोलिसाला घेऊन या ट्रकने मुंबईच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. महद्प्रयत्नानंतर ट्रकचालकाला जेरबंद करण्यात पथकास यश आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेतीतस्करीविरोधी दक्षता पथकास एमएच ०४ एफडी ९३१६ क्रमांकाचा ट्रक बुधवारी रात्री भिवंडी, माणकोली येथे दिसला. गस्तीवरील दक्षता पथकाने इनोव्हासमोर आणून ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने ट्रक सुसाट वेगात पळवला. ट्रकचालक थांबण्यास तयार नसल्याचे पाहून दक्षता पथकाने पाठलाग सुरू केला. ट्रकला ओव्हरटेक करून दक्षता पथकाने खारेगाव टोलनाका गाठला. टोलनाक्यावरील गतिरोधकावरूनही चालकाने ट्रक वेगातच काढला. टोलनाक्यावरील कर्मचारीही ट्रकचा वेग पाहून क्षणभर थबकले. त्यानंतर, दक्षता पथकाने पुन्हा ट्रकचा पाठलाग सुरू केला. पथकाने खारेगावनजीक ट्रक रोखला. ट्रकचालकास साकेत येथील मैदानावर ट्रक घेण्यास फर्मावले. मात्र, तो जुमानण्यास तयार नव्हता. त्याने पुन्हा पळून जाऊ नये, यासाठी ऋषीकेश सावंत नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यास ट्रकमध्ये बसण्यास सांगितले. परंतु, चालकाने सावंत यांना घेऊन ट्रक मुंबईच्या दिशेने पळवला. सावंत यांनी ही बाब पथकास कळवल्यानंतर पथकाने कोपरी येथील वाहतूक पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यामुळे वाहतूक पोलीस कोपरी पुलाजवळ सज्ज होते. कोपरी पुलाजवळ पोलिसांनी ट्रक अडवण्यासाठी एक कार रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. पण चालकाने या कारला जोरदार धडक दिली. मात्र, त्याला पुढे पळता आले नाही. अपघातामुळे नाइलाजाने थांबलेला ट्रक पोलीस व दक्षता पथकाने ताब्यात घेतला आणि काही तास चाललेले हे थरारनाट्य संपुष्टात आले. कारमधील महिल्या वाचल्या.
रेतीच्या ट्रकवाल्याचा सिनेस्टाइल पाठलाग!
By admin | Published: December 24, 2016 4:51 AM