अशुतोष कस्तुरे, लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस, (जि. सांगली) : बाजारात पडेल भावाने भाजीपाला मागणाऱ्याला 'तेवढं तरी कशाला देतोस, फुकटच घेऊन जा' असं शेतकरी कधी कधी त्राग्याने म्हणतो. पण एका शेतकऱ्याचा हा त्रागा इतका विकोपाला जाईल, असे कोणाला वाटले नव्हते. ढबू मिरचीचे दर गडगडल्याने हवालदिल बनलेल्या शेतकऱ्याने चक्क ट्रॉलीभर ढबू मिरची फुकट वाटली. पण, अशा स्थितीतही त्या शेतकऱ्याला चार पैसे देण्याची भावना कोणालाही झाली नाही. (Farmer sale Shimla Mirchi for free beacause of low rate in Market/)
कुंभारगाव (ता. कडेगाव) हे गाव 'भाजीपाल्याचे माहेरघर' म्हटले जाते. कुंडलपासून दोन किलोमीटरवरील कुंभारगाव (ता. कडेगाव) येथील भीमराव साळुंखे हे दरवर्षी २५ गुंठे क्षेत्रात ढबू मिरची लागवड करतात. ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. खर्च वजा जाता तीन ते चार महिन्यांत त्यांना लाखाचा तरी फायदा होतच होता. यंदा ढोबळी मिरचीचे पीक चांगले आले पण, बाजारपेठेत किलोला पाच रुपये सुद्धा दर मिळेना. ढबू मिरची बाजारपेठेत आणू नका, असे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. आता या मिरचीचे काय करायचे म्हणून त्यांनी चक्क वाटून टाकली.
अशीच परिस्थिती राहिली, तर शेतकरी देशोधडीला लागेल. शेतकऱ्याला मदतीची नाही, तर पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.- भीमराव साळुंखे, शेतकरी,