नागपूर, दि. 26 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला. देशपातळीतून जनसामान्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मात्र एरवी पश्चिम बंगाल आणि केरळामधील हिंसाचारावर तातडीने निषेध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन साधले आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे माजी प्रचारक असल्यामुळेच या मुद्यावर संघातर्फे अद्यापपर्यंत काहीही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने दोषी ठरविताच पंचकुला, सिरसा येथे हिंसेचा आगडोंबच उसळला. यात जीवितहानी तसेच कोट्यवधींची वित्तहानीदेखील झाली. हिंसा होऊ शकते याची कल्पना अगोदर असतानादेखील पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल हरयाणा सरकार व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर चोहीकडून टीका सुरू झाली. साधारणत: संघातर्फे राजकीय मुद्यांवर लगेच भाष्य करण्यात येत नाही. मात्र हा मुद्दा धार्मिक व सामाजिक असा दोहोंशीही जुळलेला आहे. शिवाय न्यायालयाने दोषी ठरविलेल्या राम रहीम याच्या समर्थकांनी खुलेआम नियमांना पायदळी तुडवले आहे. अशा स्थितीत सामाजिक संघटन म्हणून संघातर्फे या प्रकाराचा निषेध अपेक्षित होता. मात्र संघाने ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेत मौन राखणे पसंत केले आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांच्याशीदेखील प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
हा दुजाभाव का ?पश्चिम बंगालमध्ये तृणमूल समर्थक तसेच समाजकंटकांकडून हिंसाचार झाल्यानंतर संघाने कडक शब्दांत त्याचा निषेध केला होता. केरळमध्ये तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघात प्रचंड तणाव आहे. संघ स्वयंसेवकांवर डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले झाल्यानंतर संघाकडून टीकेची झोड उठविण्यात येते. असे असताना हरयाणातील हिंसाचारावर संघाने साधलेले मौन आश्चर्यजनक आहे.