ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 8 - नव्या प्रकल्पांबाबत कोणतीही स्वप्ने न दाखविता महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे ५७९ कोटी ३९ लाख रुपये महसुली जमेचे व १६ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी स्थायी समितीला सादर केले. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलेच अंदाजपत्रक सादर करणाऱ्या आयुक्त खेबूडकर यांनी भांडवली पद्धतीने कर आकारणीचे संकेत देत घरपट्टी, पाणीपट्टी, ड्रेनेज व मालमत्ता करवाढीची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांवर गेल्या तीन वर्षातील फरकासहित १५ ते २० टक्के वाढीव कराचा बोजा पडणार आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आयुक्त खेबूडकर यांनी सभापती संगीता हारगे यांच्याकडे या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. मागील वर्षी पालिका प्रशासनाने ७८५ कोटींचे अंदाजपत्रक दिले होते. त्यात स्थायी समिती आणि महासभेने ५० कोटी वाढ केली होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटीने कमी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात नोव्हेंबरअखेरपर्यंत १८० कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. उर्वरित पाच महिन्यांत थकबाकीसह २७६ कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्याशिवाय विविध शासकीय योजनांसाठी चालू वर्षात महापालिकेला १३० कोटी प्राप्त होतील.
सांगलीत नागरिकांवर १५ ते २० टक्के करवाढीचा बोजा
By admin | Published: February 08, 2017 6:15 PM