मिरज :जीएसटी बिलाच्या बनावट पावत्या तयार करून सुमारे ५२ कोटी रुपये जीएसटी परतावा घेणाऱ्या पुण्यातील व्यावसायिकास जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागीय पथकाने अटक केली आहे. या प्रकरणाचेसांगली कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्याने चाैकशी सुरू केली आहे.
तब्बल ५२ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी जीएसटी विभागाने पुण्यातील रितू व रियूज एंटरप्रायजेसचे मालक तुषार अशोक मुनोत (वय ३६) यांना अटक केली. मुनोत यांनी बनावट पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स जमा करून ५२ कोटी १९ लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुनोत यांच्या मालकीच्या पुण्यात चार फर्म आहेत. सांगलीत कागदोपत्री सूरज पाटील यांची मालकी असलेल्या पाटील कॉन्ट्रॅक्टर या इंजिनीअरिंग साहित्य विक्री करणाऱ्या उद्योगाची मालकीही मुनोत यांची आहे. सांगली जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या पाटील काॅन्ट्रॅक्टर या उद्योगामार्फत सुमारे ३० कोटींची बिले घेऊन मुनोत यांनी या उलाढालीचा १८ टक्के परतावा घेतला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. मुनोत यांच्या रितू एंटरप्राइजेस व रियूज एंटरप्राइजेस या केवळ दोन कंपन्या अस्तित्वात असून, इतर तीन कंपन्या केवळ कागदावरच आहेत. जीएसटी इन्व्हॉईस असलेल्या या सर्व पाच कंपन्यांनी कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता जीएसटी पावत्या दिल्या.
या पावत्यांच्या आधारे तब्बल ५२ कोटी रुपये जीएसटी परतावा घेण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एका गावातून मुनोत यांना अटक करण्यात आली. ३१७ कोटी करपात्र मूल्य असलेल्या बनावट व्यवहारात ५२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यात सांगलीतील उद्योगाद्वारे झालेली ३२ कोटींची उलाढाल समाविष्ट आहे. या घोटाळ्यात सहभागी सांगलीतील उद्योगासह इतरांचीही जीएसटी विभागाकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.