सांगली- लोकसभेनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. आटपाडी खानापूर मतदारसंघात शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दिला त्यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसनं लोकसभेत आमचा विश्वासघात केला तसाच विधानसभेतही होणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेससोबत आघाडी करू नका अशी मागणी जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, ज्या विश्वासाने उद्धव ठाकरेंनी दिल्ली भेटीत विशाल पाटलांना माफ केले त्याचाच पुन्हा विश्वासघात करून खासदार विशाल पाटलांनी माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे सिद्ध केले. वरिष्ठांकडे वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यात वेगळी भूमिका मांडायची हे उद्धव ठाकरेंना आम्ही समजून सांगणार आहोत. सांगली जिल्ह्यात आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले पण पुढेही काँग्रेसकडून विधानसभेला विश्वासघात होणार आहे याचे संकेत विशाल पाटलांनी दिले आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच आपला खरा शत्रू भाजपा-शिंदे गट आहे. पण त्यांच्याच व्यासपीठावर जात खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. माझी शिवसेना-काँग्रेसच्या वरिष्ठांना विनंती आहे आपण सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये. असाच पाठीत खंजीर खुपसणार असाल तर सांगली जिल्ह्यात आघाडी न केलेली बरी. त्यापेक्षा काँग्रेसनं शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देऊन टाकावा. ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडी करतेय त्या विश्वासाला तडा देण्याचं काम खासदार विशाल पाटील करतायेत असंही जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितले.
दरम्यान, माझी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही. सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा वरिष्ठांनी फेरविचार करावा अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे.