सांगली - Vishwajeet Kadam on Uddhav Thackeray ( Marathi News ) मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा सांगलीत पार पडली. या सभेला उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, विश्वजित कदम आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा सांगलीची जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असला तरी आम्हीही सांगलीचे वाघ आहोत असं विधान कदम यांनी ठाकरेंसमोर केले.
या सभेत विश्वजित कदम म्हणाले की, आम्ही जिल्ह्यातील तरुण पिढीचे काँग्रेस कार्यकर्ते खंबीरपणे काम करत होतो. ही जागा आम्हाला मिळेल अशी आशा बाळगली. लोकशाहीत प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात, तालुक्यात काम करताना प्रत्येकाला ही जागा आपल्याला मिळाली असं सांगत होते. त्यासाठी आम्हीही लढत होतो, पक्षश्रेष्ठींकडे ही जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह होता. परंतु दुर्दैवाने ही जागा मविआच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ही जागा आम्हाला मिळाली नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
त्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्राचा वाघ म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन आहे. पण जसे तुम्ही वाघ आहात तसे सांगली जिल्ह्यातील आम्हीही वाघ आहोत. वाघ म्हणून जे काही आम्हाला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असंही काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं.
सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे निर्णय बदलणार नाहीत
सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेला का दिली, हा प्रश्न मी करू शकतो, पण मी नाही केला. ही तुमच्या दोघांमधील चर्चा आहे. आम्ही ही जागा मागितली नव्हती. आम्हाला १३-१४ जागा हव्या होत्या. त्या हळूहळू १० वर आल्या. मी त्या चिंतेत होतो. ठीक आहे, हा निर्णय झाला तर त्यामागे ताकदीने उभं राहायचं. उद्धव ठाकरेंचा स्वभाव असा की, एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्यावेळीस पश्चिमेला उगवेल पण ते निर्णय बदलणार नाहीत असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
...तर मी सांगली सोडली असती
विश्वजित, मी आज सर्वांसमोर सांगतो, सांगलीची जागा विश्वजितला देतायेत हे मला कळलं असतं तर मी त्याचदिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि प्रेम माझे तुझ्यावर आहे. आपण आता एक पाऊल पुढे गेले पाहिजे. जर इथल्या काँग्रेसच्या लोकांना आणि आणखी कुणाचे फोटो लागलेत त्यांना वाटत असेल उद्या शिवसेना तुमच्या भविष्याच्या आड येईल. तर असं अजिबात होणार नाही. तुमच्या भविष्याचे आम्ही ओरबाडून घ्यायला आलो नाही. ही सांगली मला जिंकायचीच आहे अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.