मुंबई : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ उद्धव सेनेच्या वाट्याला गेल्याने बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. सांगलीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच उद्धव सेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासून काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले. सांगलीतील आमदार विश्वजित कदम, विक्रम सावंत यांनी दिल्लीपर्यंत त्यासाठी धाव घेतली. मात्र, उद्धव ठाकरे हा मतदारसंघ न सोडण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. महाविकास आघाडीत कटुता निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. मात्र, तरीही काँग्रेसचे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी बाळासाहेब थोरात सोमवारी सांगलीत जाणार आहेत.
विशाल पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्व गोष्टी पुढे व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्हाला नक्की यश मिळेल. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस