सांगली - Congress Party Workers Upset ( Marathi News ) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतसांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा पाहायला मिळत होता. त्यात आता अधिकृतपणे मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार हे घोषित झाल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यात सगळ्यांना पुरून उरणार, आमचं काय चुकलं, आता निर्णय जनतेच्या कोर्टात असे संदेश दिले जात आहेत.
याबाबत विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर जमलेले काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले की, आज आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे. महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला. सगळी वस्तूस्थिती माहिती असून जाणुनबुजून मविआतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे. या निर्णयाचा निषेध आहे. जो निर्णय वरिष्ठ घेतील त्याला बांधील आहे. सांगली जिल्हा वसंतदादा, पतंगराव कदम यांचा आहे. या निर्णय चुकीचा असून या निर्णयाचा निषेध करतो. घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आहेत. पगारावर कार्यकर्ते नाहीत. आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत. ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेस नेत्यांचं मौन
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्णय झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन बाळगलं आहे. सांगलीऐवजी उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागा काँग्रेस लढवणार आहेत. सांगलीत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेत. विशाल पाटील, विश्वजित कदम हे सध्या नॉट रिचेबल झाले असून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सांगलीत ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगलीत सभा घेत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली. या घोषणेनंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आघाडी धर्म पाळण्याची आठवण ठाकरे गटाला करून दिली. परंतु ठाकरे गट सुरुवातीपासून सांगलीच्या जागेवर आक्रमक राहिला. कुठल्याही परिस्थितीत उमेदवार मागे घेणार नाही असं ठाकरेंनी ठणकावलं. त्या भूमिकेनंतर काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेत आता ही ठाकरे गटाला दिली आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येते.