सांगली - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप तिढा आहे. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यात ठाकरे गटाकडूनही उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच सांगलीत संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.
संजय राऊतांनी म्हटलं की, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर त्याला राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर राज्यातील ४८ जागांवर तशा लढती होईल. आघाडी किंवा युती असो कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री होते किंवा लढत होते असा सूचक इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा ते आढावा घेत आहेत.
त्याचसोबत चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात ३ पक्षांनी स्थापन केली. अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम चालवलं. ज्यारितीने हे सरकार पाडलं त्याचा जनतेमध्ये रोष आहे. २०२४ च्या निवडणुकीत जो अबकी बार ४०० पार नारा दिला आहे. तो किती भंपक, फसवा आहे हे निकालानंतर कळेल. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत देशात पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार नाही हे जनमानस आहे असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. गेमचेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये निर्णयाक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. राज्यातील ४८ पैकी किमान ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभेच्या जागावाटपात तिन्ही पक्षांनी काळजीपूर्वक भूमिका बजावली आहे. आघाडी, युती म्हटली की एकादुसऱ्या जागेवर वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला हा मतदारसंघ आपल्यालाच सुटावा असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. मुंबईत आमची ताकद आहे. तिथे ४-५ जागा आम्ही लढतोय. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेचा राजकीय नेता म्हणून आदर करतो असं संजय राऊतांनी म्हटलं.
सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल
कोल्हापूर, रामटेक या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यात. अमरावती जागा लढतो आणि जिंकतोय तीही जागा आम्ही काँग्रेसला दिली. देवाणघेवाण आघाडीत होत असते, त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. १-२ दिवसांत सांगलीतील काँग्रेसची भूमिका शांत होईल. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघेही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. उद्याच्या राजकारणात विशाल पाटलांना नक्कीच महत्त्वाची भूमिका मिळेल त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. आम्ही एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार चर्चा होईल आणि १-२ दिवसांत सांगलीतील वाद शांत होईल