सांगली - Congress Vishwajeet Kadam on Mahavikas Aghadi ( Marathi News ) काँग्रेसलासांगलीची जागा मिळावी अशी सातत्याने १५ दिवसांपासून मागणी केली. त्यात काल महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केले. आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे. ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे. राज्य आणि देशात जे वातावरण आहे ते नाकारत नाही. परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा असून मविआनं गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे.
सांगलीत पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा ही काँग्रेसकडे असावी, काँग्रेसनं ती लढावी, ही जागा लढण्यास काँग्रेस सक्षम आहे. इथं २ काँग्रेसच्या आमदार आहेत. एक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आहेत. स्थानिक जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी असं आपण नेत्यांना पटवून देत होतो. कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींना पंजा चिन्हावर लढायची होती त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. परंतु उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत जाहीर केली. हा एकतर्फी निर्णय होता, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता. उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन जर निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असं त्यांनी म्हटलं.
तसेच एखादी बातमी पचनी पडायला वेळ लागतो, काल सांगलीची बातमी कानावर पडली तेव्हा आमची ही परिस्थिती निर्माण झाली. आम्ही काँग्रेस पक्षाच्या घटक कार्यकर्त्यांची बोलून जी वस्तूस्थिती समजून घेवून काँग्रेसला ही जागा द्यावी अशी आमची विनंती करतो. येणाऱ्या काळात या जागेबाबत कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू. येणाऱ्या दिवसांत विशाल पाटील वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांना भेटतील. कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडे आहे. त्यांच्या मनातील भावना समजून घेणे ही नैतिक जबाबदारी आहे. आमच्या भावना आणि जनतेच्या भावना आम्ही पुढे काँग्रेस नेत्यांना सांगू असं विश्वजित कदमांनी म्हटलं.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील भाजपा सरकारने जो चुकीचा कारभार केलाय त्यांना हद्दपार करायचा आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आम्ही भावना मांडतोय. फक्त २४ तास झालेत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटतायेत. त्यांच्या भावना ऐकून जे काही महाविकास आघाडीचं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही पार पाडू असंही विश्वजित कदमांनी स्पष्ट केले.