आक्रमक भाषा मुंबईत चालते, इथं सांगलीत नाही; विशाल पाटलांचा संजय राऊतांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:23 PM2024-04-08T17:23:05+5:302024-04-08T17:23:35+5:30
Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. या जागेवरील तिढा सोडवून उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे.
सांगली - Vishal Patil on Sanjay Raut ( Marathi News ) सांगलीत सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे. सांगलीत आक्रमक भाषण चालत नाही. ही भाषा मुंबईत चालते. सांगलीतल्या लोकांना संजय राऊतांची भाषा रुचली नाही असं विधान काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे.
विशाल पाटील म्हणाले की, आक्रमक बोलणं ही शिवसेनेची स्टाईल आहे. पण सांगलीत ही ताकद व्यर्थ घालवायला नको. मुंबईत चर्चा करून दौरा केला असता तर बरे झाले असते. ज्या लोकांच्या जीवावर ही जागा निवडून आणायची त्यांच्यावरच टीका केली गेली. विश्वजित कदम हे पक्षासाठी भांडत होते. त्यांच्यावर आरोप करणे ही चुकीची रणनीती ठरली. हे चुकलं म्हणून मी आज बोलायला पुढे आलो असं त्यांनी सांगितले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्याशिवाय विश्वजित कदम काँग्रेसच्या हक्कांसाठी बोलत होते. आम्ही कुठलेही विधान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांबाबत केले नाही. आम्ही खूप संयमाने बोलत होतो. पण संजय राऊत सांगलीत आले, स्वाभाविक आमचे कुणीही नेते, कार्यकर्ते गेले नाहीत. त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातून ते दुखावले गेले असावेत आणि त्यातून टीका केली. संजय राऊत स्वत: बोध घेतील असं विशाल पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसकडेच राहील यासाठी वरिष्ठ नेतेही आग्रही आहेत. शिवसेनेनं परस्पर निर्णय जाहीर केला. चर्चेतून निर्णय घ्यायला हवा होता. गेल्या ५ वर्षात हे सरकार किती अपयशी ठरलंय हे जनतेला आम्ही दाखवलं आहे. सांगलीत भाजपाला निवडून द्यायचे नाही हे जनतेनं ठरवलंय. शिवसेनेनं आत्मपरिक्षण करायला हवं, लहान मुलगाही आला असता तरी कुणीही सांगेल त्यांनी दिलेला उमेदवार हा भाजपाचा पराभव करू शकत नाही असंही विशाल पाटील म्हणाले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा विषय मिटावा
भाजपाला पाडायचं असेल तर सांगलीत काँग्रेसच हवी. पक्षनेतृत्वावर आमचा विश्वास आहे. राज्यात आणि देशात निवडणूक सुरू असताना २-३ दिवस संजय राऊत सांगलीत थांबतात. एवढा काय विषय आहे कळत नाही. संयुक्त पत्रकार परिषद आहे त्यात सांगलीची जागा कुणाला याचा निर्णय होईल. आमचा पक्षनेतृत्वावर विश्वास आहे. ही जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी विश्वजित कदम प्रयत्न करतायेत. ही जागा कदम खेचून आणतील हा विश्वास आहे. शिवसेना हा निर्णय स्वीकारेल आणि काँग्रेस पक्ष ही जागा लढेल असं वाटतं. गुढीपाडवा मुहुर्तावर हा विषय मिटावा. महाविकास आघाडीतील बिघाडी दिसू नये. उद्या जो काही निर्णय असेल तो होईल असं विशाल पाटील यांनी सांगितले.
वसंतदादा-बाळासाहेब यांच्यात चांगले संबंध
उद्धव ठाकरे हे संजय राऊतांवर अवलंबून आहे आणि संजय राऊतांनाही प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती माहिती नसावी. सांगली जिल्ह्यात ठाकरे कुटुंबाला सहानुभूती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादांचे चांगले संबंध होते. वसंतदादांचा पुतळा ज्या चौकात आहेत त्या चौकाला बाळासाहेब ठाकरे हे नाव सांगलीनेच दिले. वारसाने चांगल्या गोष्टी मिळतात तशा संघर्षातूनही मिळतात असं सांगत राऊतांच्या घराणेशाहीवरील टीकेवर विशाल पाटलांनी उत्तर दिलं.