भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:39 PM2024-10-29T20:39:39+5:302024-10-29T20:44:19+5:30
सांगलीत काँग्रेस आणि भाजपमधील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर समोर आला आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने किंवा आयत्या वेळी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारी मिळाल्याने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याच नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण आता या बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवरांचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. सांगली जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभेला झालेल्या सांगली पॅटर्नची पुन्हा एकदा जिल्ह्यात पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामधील प्रमुख पक्षांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालय. मात्र असे असले तरी पाच मतदारसंघात अधिकृत उमेदवारांची बंडखोर उमेदवारांमुळे चांगलीच कोंडी झालीय. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप आणि काँग्रेसला बसणार आहे. भाजपला शिराळा, जत व सांगली या तीन मतदारसंघात, तर काँग्रेसला सांगलीत बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. विधानसभेलाही असाच निकाल लागेल या अपेक्षेने बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील या काँग्रेसकडून इच्छुक असतानाही त्यांना डावलून पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. तर मिरजची जागा ठाकरे गटाला मिळाली असताना काँग्रेसचे मोहन व्हनखंडे याठिकाणी अर्ज दाखल केला.
दुसरीकडे, खानापूर मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सुटली असली तरी या मतदारसंघातून भाजपचे ब्रह्मानंद पडळकर बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. शिराळ्यात सम्राट महाडिक यांनी तर जतमध्ये तम्मनगौडा रवी यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष लढण्याचं ठरवलं आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या सगळ्यात पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाद मिटविण्याची मागणी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर असल्याने उमेदवारांकडून बंडखोरांचे बंड शमविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.