अतुल कुलकर्णी,
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे, तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. काँग्रेसतर्फे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी सांगली - साताऱ्यासाठी आपला हट्ट कायम ठेवला आहे तर राष्ट्रवादीने याच मतदारसंघात शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊ केली आहे.गोरे यांची उमेदवारी याआधीच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी स्वत:च सांगलीत जाहीर करून टाकली होती. त्यांचे आणि पतंगराव कदम यांचे आपापसांतील राजकीय युद्ध या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील सांगली-साताऱ्याच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी तीन तीन जागा लढवाव्यात, असा मुद्दा उपस्थित केल्याने आघाडीवर निर्णय अद्याप लटकलेला आहे.उमेदवारी दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना मंगळवारी राष्ट्रवादीने सांगली-साताऱ्यासाठी विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांच्याऐवजी शेखर गोरे यांची तर पुण्यातून विद्यमान आ. अनिल भोसले आणि भंडारा-गोंदियाहून आ. राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सांगली सातारा जिल्हा परिषद आमच्याकडे आहे, सगळ्या नगरपालिका, आमदार, खासदार आमच्या पक्षाचे आहेत अशावेळी काँग्रेसने याच जागेसाठी हट्ट धरणे योग्य नाही. सांगली साताऱ्याची जागा राष्ट्रवादीतर्फेच लढवली जाईल, त्यात बदल होणार नाही. पक्षाने अधिकृत नावे जाहीर करण्याआधीच जयंत पाटील यांनी गोरे यांचे नाव जाहीर का केले? असे विचारले असता तटकरे म्हणाले, जयंत पाटीलदेखील आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी नाव जाहीर केले त्यात चूक काय?नांदेडसाठी काँग्रेसने विद्यमान आ. अमर राजूरकर यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र यवतमाळ आणि जळगाव या जागा कोणी लढवायच्या याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यवतमाळची जागा काँग्रेसला हवी आहे. तेथून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. संदीप बाजोरिया यांना तिकीट न देता ती जागा काँग्रेसला द्यावी, असेही ठरवले जात आहे. मात्र त्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अजून बोलणी सुरू आहे, एवढेच उत्तर दिले. आम्हाला अजूनही आघाडी करण्याची इच्छा आहे आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टळावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यासाठी आशावादी आहोत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. यवतमाळमधून बाजोरिया स्वत:च्या भावाला सर्वपक्षीय आघाडी करुन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एकीकडे काँग्रेसला जागा सोडायची आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करायचा, असा डाव यामागे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तर ५ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ११ नोव्हेंबरला या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.