सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये ७ बचत गटांसाठी एकाच ठिकाणी विनापरवाना शालेय पोषण आहारातील खाऊ शिजविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन, महापालिका अधिकारी, एकात्मिक बाल विकास विभागाने ठेकेदारावर छापा टाकून साहित्य ताब्यात घेतले आहे. कुपवाडमधील २१ अंगणवाड्यांसाठी ७ बचत गटांना एकात्मिक बाल विकास विभागाकडून शालेय पोषण आहाराचा ठेका देण्यात आला आहे. या सातही ठिकाणचा खाऊ कोल्हापूर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये शिजविला जात असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेश देशमुख यांना मिळाली. त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. सकाळी १० वाजता तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाई करीत ठेकेदारावर छापा टाकला. अंगणवाड्यांसाठी खाऊ घेऊन जाणारे वाहन अडविण्यात आले आणि तपासणी करण्यात आली. ठेकेदाराकडे कागदपत्रांची मागणी केली असता, त्यातही बोगसगिरी आढळून आली आहे. ७ बचत गटांपैकी ४ गट शारदानगर, कुपवाड येथील आहेत. रामकृष्ण सोसायटी व सांगलीतील खणभागातील एका बचत गटाला ठेका दिला आहे. या बचत गटांनी अन्न शिजविण्याचा पत्ता मात्र वेगळाच दिला आहे. शारदानगर, रामकृष्ण सोसायटी, खणभागात स्वयंपाकघर असल्याचे अर्जात म्हटले आहे.वस्तुत: कोल्हापूर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये हे काम चालते. हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू असल्याचे छाप्यावेळी आढळून आले. अन्न शिजविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन व महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. पत्र्याच्या शेडमध्ये स्वच्छतेचा अभाव होता. या साऱ्या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकारीही अचंबित झाले. त्यांनी पंचनामा करून अन्नाचे नमुने व कागदपत्रे ताब्यात घेतली. शालेय पोषणचा ठेका रद्द करून या ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उमेश देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत पोषण आहार ठेकेदारावर छापा
By admin | Published: May 02, 2015 1:08 AM