मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष रिंगणात उतरलेले उमेदवार विशाल पाटील विजयी होतील, असा एक्झिट पोलचा अंदाज असल्याने यावरून महाविकास आघाडीतील उद्धव सेना आणि काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील हे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत. जागावाटपापासून सांगलीवरून या दोन पक्षांत वाद सुरू होता, तो टोकाला पोहोचण्याची चिन्हे आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजावर उद्धव सेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघात मी नंतर बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आम्ही इथे गोट्या खेळायला बसलेलो नाही. आमचेसुद्धा संपूर्ण आयुष्य राजकारणात गेले आहे, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी काँग्रेसला दिला.
‘राऊत लंडनहून जास्त काय शिकून आले ते माहिती नाही’ संजय राऊत यांच्या या विधानाचा रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेतला. राऊत यांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही. राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्यांच्या गावात पिण्याचे पाणी, दवाखाना, त्यांचे बाळंतपण ज्या दवाखान्यात झाले ते काँग्रेसने निर्माण केले होते.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवण्याचे कामही काँग्रेसने केले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर का प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहेत. याशिवाय ते कालच लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून जास्त काय शिकून आले ते माहिती नाही, असा खोचक टोला पटोले यांनी राऊत यांना लगावला आहे.