डहाणू : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि पालघर जिल्हा खो - खो असोसिएशनच्यावतीने चिंचणी के. डी. हायस्कुल येथे पार पडलेल्या ३३ वी राज्य अजिंक्यपद निवड व चाचणीत किशोर गटात सांगली जिल्हा तर किशोरी गटात पुणे जिल्हयाने अजिंक्यपद पटकावले. किशोरी गटातून औरंगाबाद जिल्हा तर किशोर गटात पुणे जिल्हयाला उपविजेतेपद मिळाले.किशोर गटात सांगलीकरांनी अप्रतिम खेळ करताना गतविजेत्या पुण्याचे दुहेरी विजेतेपदांचे स्वप्न धुळीस मिळवले. उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सांगलीने बलाढ्य पुण्याचा निर्णायक सामन्यात पराभव केला. त्याचवेळी, दुसरीकडे पुण्याच्या मुलींनी किशोरी गटातील आपले जेतेपद राखताना औरंगाबादला सहज नमवले. वेगवान आक्रमण आणि चपळ बचाव या जोरावर पुणेकरांनी औरंगाबादविरुद्ध सहज वर्चस्व राखले. तत्पूर्वी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघाला सांगली संघाकडून ११-१३ अशा २ गुणांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत सांगलीच्या नागेश चोरलेकर (२ व २.२० मिनिटे), सौरभ अहिर (१.५० मिनिटे व ३ गडी) यांनी केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर सांगलीने पहिल्या डावात ९-५ अशी आघाडी घेतली.दुसरीकडे, उपनगरचा कर्णधार सिद्धेश थोरातने एकाकी झुंज दिली. दोन्ही डावात सिद्धेशने प्रत्येकी २.४० मिनिटांचे जबरदस्त संरक्षण करताना आक्रमणातही त्याने २ गडी बाद केले. सिद्धेशच्या अष्टपैलू कामगिरीमुळे उपनगरने ६-४ अशी बाजी मारली घेतली. मात्र, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सांगलीने बाजी मारली. दुसरीकडे, बलाढ्य पुण्याने किशोर गटात सोलापूर संघावर (७-४,७-२) १४-६ अशी मात केली. तर किशोरी गटात उस्मानाबाद संघाचा १२-१० असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. (क्रीडा प्रतिनिधी)
सांगलीचे शानदार विजेतेपद
By admin | Published: February 06, 2017 1:14 AM