पुणे : सांगली व सातारा जिल्ह्यातील कुख्यात गुंड तसेच महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खुनाचा सूत्रधार सलीम ऊर्फ सल्ल्या चेप्या याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. पाठीच्या मणक्यात गोळी लागल्यामुळे त्याला अर्धांगवायू झालेला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. सलीम ऊर्फ सल्ल्या चेप्या मोहम्मद शेख (४२, रा. शनिवार पेठ, शिंदे गल्ली, कराड) असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याच्यावर २०१२ मध्ये गोळीबार झाला होता. सातारा, सांगली जिल्ह्यात त्याची दहशत होती. त्याच्यावर खंडणी, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगण्यासोबतच खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल झाले होते.सल्ल्याच्या टोळीने महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा २००९ साली कराडमध्ये गोळ्या झाडून खून केला होता. २० जुलै २०१५ मध्ये कराडमधील गुरुवार पेठेत बबलू ऊर्फ उमेश भीमराव माने यांनाही त्याच्या टोळीने मारले होते. त्यानंतर सल्ल्याचा साथीदार बाबर शमशाद खान (४८, रा. मलकापूर, ता. कराड) याचा जमावाने दगडाने ठेचून खून केला होता. सल्ल्यासह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. कराड, सातारा व पुण्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेतलेल्या सल्ल्याला मानेचा व पाठीचा त्रास वाढला होता. न्यायालयाच्या आदेशाने त्याला २४ नोव्हेंबरला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
सांगलीचा कुख्यात गुंड सल्ल्या चेप्याचा मृत्यू
By admin | Published: December 24, 2015 2:32 AM