मुंबई - सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही, वेळ आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले. कदमांसह सांगलीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत काँग्रेसचा उमेदवार असेल असं स्पष्ट केले. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंना संयमाने बोललं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्हाला सर्व पातळीवर भाजपाचा पराभव करायचा आहे. कोणाला भाजपाला मदत करून काही साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यातील मविआचे जागावाटप अंतिम झालं आहे. त्या बैठकीत दिल्लीतील ५ प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार, जयंत पाटील आणि मी स्वत: होतो. नेहरू सेंटरमध्ये झालेल्या जागावाटपानंतर कुणी काही भूमिका घेत असेल तर त्यावर बोलणार नाही. पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संयमाने भूमिका घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची तयारी आहे. सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाला दिली आहे. तिकडे कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल. तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी कुणाचे नाव घेतले नाही. भाजपाला मदत करून कुणाला काही साध्य करायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी सांगितले.
काय म्हणाले होते नाना पटोले?
महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला माध्यमांसमोर येतोय तसा काही ठरला नाही. अजूनही जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही खोटी बातमी आहे. सांगलीत आमचे उमेदवार विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहे. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे त्यामुळे अद्याप जाहीर केले नाही. ४-५ जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होते.