मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आला आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. मात्र, या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरे गटाकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, सांगलीची जागा आम्हीच लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडीच्या आहेत. त्यामुळे त्या फक्त शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नाहीत. शिवसेनेचे सर्व जागा जिंकण्याचे स्पष्ट व्हिजन आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, सांगलीची जागा शिवसेनेकडे असल्याने काही लोकांमध्ये नाराजी असू शकते. अमरावती आणि कोल्हापूर आमच्या जागा होत्या, पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावले आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसचे काही लोक नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी काँग्रेसच्या वरिष्ट नेतृत्वाची आहे. तसेच, सांगलीची जागा जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. त्याबदल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगली लोकसभेची जागा आपल्याकडे घेतली आहे. कोल्हापूरात काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. परंतु, सांगलीच्या जागेसाठी स्थानिक काँग्रेस नेते तसेच राज्य पातळीवरील काही नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. त्यामुळे या जागेबाबत अद्यात तिढा कायम असल्याचे सांगितले जाते.