Congress Sangram Thopte News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेसतूनही अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करताना पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात खिंडार पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेस सोडायची वेळ का आली, याची यादीच वाचून दाखवताना भाजपामध्ये कधी प्रवेश करणार, याची तारीखही जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. यामुळे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. यानंतर आता आपली सविस्तर भूमिका संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केली.
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली
काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे. ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा डावलण्यात आले. कार्याध्यक्षपद दिले नाही, विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद मिळेल, असे वाटले; पण, तिथे ही संधी मिळाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता, म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होते की, भाजपामध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल. सलग तीन वेळा निवडून आलो, पण पक्षाने ताकद द्यायला पाहिजे, ती दिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जर ताकद दिली असती तर विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. मला पक्ष प्रवेश करताना कोणते आश्वासन दिले नाही. मी कोणत्याही पदासाठी गेलो नाही. २०१९ पासून नाराजीला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात वजन वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फॉर्म भरायला पक्षश्रेष्ठींना बोलावले, कुणी वेळ दिला नाही. मी पडल्यावर पण मला फोन केला नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये आश्वासक चेहरा नाही. अनेक प्रकल्प आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. अनेकदा कात्री लागली. सत्ता असताना काही कामे झाली नाहीत. मुळशी तालुक्यात लोकसभेला मतदान झाले ते विधानसभाला झाले नाही. कार्यकर्त्यांनी कामे केले नाही, अशी खंत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली.
विकासकामांना गती द्यायची असेल तर भाजपात प्रवेश केला पाहिजे
आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे की, तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचे काम करत आहात. मात्र, प्रामाणिकपणे काम करत असतानाही पक्षाने तुम्हाला कायम डावलण्याचे काम केले. शेवटी तुम्हाला मतदारसंघात जनतेनी तीन वेळा संधी दिली. मतदारसंघात तुम्ही विकासाची कामे केली. पण मतदारसंघात अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावे लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे. देशात किंवा राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मत आहे की आपल्या मतदारसंघात विकासकामांना जर गती द्यायची असेल तर भाजपामध्ये प्रवेश केला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आता माझी वैयक्तिक भूमिका आधीच सांगितली होती की, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ठरवेन. आता कार्यकर्त्यांचे मत आहे की, मी भारतीय जनता पक्षाची राजकीय भूमिका घेतली पाहिजे. तेथेच आपल्याला न्याय मिळेल, असे थोपटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपामध्ये कधी प्रवेश होणार, याबाबत बोलताना संग्राम थोपटे म्हणाले की, येणाऱ्या २२ एप्रिल रोजी भाजपामध्ये पक्ष प्रवेश होईल. या पक्ष प्रवेशाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती संग्राम थोपटे यांनी दिली.