लोकमत न्यूज नेटवर्कवसई : निरोगी रज:काल सप्ताहानिमित्ताने वसई विरार महापालिका स्टेप अप इंडियाच्या मदतीने आपल्या हद्दीतील आरोग्य केंद्रांमध्ये चार ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशीन बसवणार आहे. जागतिक रज:काल दिनानिमित्ताने वसई विरार महापालिका आणि स्टेप अप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी रज:काल स्वास्थ नियोजन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून महापालिकेच्या चार आरोग्य केंद्रांमध्ये ही मशीन बसवण्यात येणार आहे, अशी माहिती स्टेप अप इंडियाच्या यती राऊत आणि स्वरुपा शिर्सेकर यांनी दिली. महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी तुळींज हॉस्पीटलमध्ये पहिले मशीन बसवण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट हॉस्पीटलमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या हस्ते दुसरे मशिन बसवण्यात येणार आहे.तिसरे मशीन बुधवारी धानीव येथील आरोग्य केंद्रात उपमहापौर उमेश नाईक यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्रात चौथे मशिन बसवले जाणार आहे. चारपैकी तीन मशिनचा खर्च महापालिका करणार आहे. तर स्टेप अप इंडियातर्फे एक मशिन दिले जाणार आहे.
आरोग्य केंद्रात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन
By admin | Published: June 05, 2017 3:10 AM