- मनोहर कुंभेजकरमुंबई : अंधेरी पश्चिम येथील मुंबई महापालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि नागरी कामांसाठी येथे येणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी नि:शुल्क सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहेत. सदर मशीनचे अनावरण त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिका विभाग कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याची ही पहिलीच घटना आहे.यावेळी येथे झालेल्या कार्यक्रमात वॉर्ड क्रमांक ६०चे भाजपा नगरसेवक व के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर आणि वॉर्ड क्रमांक ६३च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील, के- पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड, प्रशासकीय अधिकारी नंदिनी खरे, महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार डॉ. लव्हेकर यांनी महिला पालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मासिक पाळीबद्दल खुलेपणाने चर्चा करा, मुलींपेक्षा पौगंडावस्थेतील मुलांवर पाळी आणि महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत संस्कार करण्याचे प्रतिपादन केले.गेल्या २५ वर्षांपासून स्त्री-भ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, मासिक पाळीतील स्वच्छता आदी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मी करतेय. आज केवळ १५ % स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरायला मिळतात. मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता न राखल्यामुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका बळावतो. आमच्या 'ती फाऊंडेशन'द्वारे ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आंबोली आणि वर्सोवा पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय या विविध ठिकाणी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किट बसवून देण्यात आली असून, त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी मी ही मशीन उपलब्ध करून देत असून वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्यांनीही महिलांच्या या गरजेकडे डोळस नजरेने पाहावे, असे वक्तव्य त्यांनी केले.यावेळी आपल्या भाषणात साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी आमदार डॉ. लव्हेकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. जेव्हा एखादी महिला कर्मचारी सुट्टी घेते तेव्हा त्याचे नेमके कारण कळत नाही, कारण या गोष्टींविषयी उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळे पुरुष सहकाऱ्यांना याबद्दल माहिती करून देणं आवश्यक आहे. हे मशीन आणि सॅनिटरी पॅड नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिले त्याबद्धल त्यांनी आभार मानले. आता येथील महिला कर्मचाऱ्यांचे ते त्रासाचे 5 दिवस सुसह्य होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सॅनिटरी व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्धतेसाठी स्मार्ट कार्डचे वाटपही महिला कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
महापालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयात महिलांसाठी बसवले सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 4:22 PM