रेल्वे स्थानकाने टाकली कात...! भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे गेल्या १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहात विभागातील भुसावळसह सर्वच रेल्वे स्थानक आणि फलाटासह परीसराची सफाई केली जात आहे. स्थानक व परीसर अस्वच्छ राहू नये यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. याचाच परिणाम म्हणून ‘भुसावळ रेल्वे स्थानक’ चकाचक झाले असून या स्थानकाने कात टाकल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, डीआरएम सुधीरकुमार गुप्ता हे अचानक आणि नियोजन करुन रेल्वे स्थानकाची पाहणी करीत असल्यामुळे स्वच्छता निट राखली जात आहे.
स्वच्छतेवर पथनाट्यगुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांच्या समोर भुसावळातील सेंट्रल रेल्वे सिनिअर सेकंडरी (इंग्रजी माध्यम) हायस्कूलच्या स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर पथनाट्य सादर केले.
यात फलाट, स्थानक, परीसर, रेल्वे, शहर, जिल्हा, राज्य व देशात स्वच्छता राखण्यासाठी संदेश देण्यात आला. फलाटावर खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर वा चहा आदी पेय घेतल्यानंतर प्लॅस्टिक कप कचरापेटीत टाकण्याबाबत पथनाट्याद्वारे जागृती करण्यात आली.
या शिवाय घरात स्वच्छता आहे मात्र परीसरात घाण असेल तर आजारी पडण्याचा धोका संभवतो यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पथनाट्यातील मुलांचे डीआरएम गुप्ता यांनी कौतुक केले़. केवळ स्वच्छताच नाही तर पर्यावरण संतुलनासाठी देखील प्रशासन आग्रही आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या व्हीआयपी साईडिंग परीसरात वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धनाची व्यवस्था केली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावरील आठही फलाट स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
फलाटावर भिकारी आदी यांना फिरकू दिले जात नाही. कोणीही घाण करणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या शिवाय खान पान विभाग, गार्ड आणि ड्रायव्हर लॉबी, स्थानकाच्या दक्षिण भागातील द्वितीयश्रेणी प्रतीक्षालय, आरक्षण कार्यालय, उड्डाणपूल, स्वच्छता गृहातील स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय अभियंता ए.के.सिंग, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता डी. के. गजभिये, विभागीय अभियंता एम. जगदीश, स्थानक अभियंता आर. एन.देशपांडे, स्थानक व्यवस्थापक आर.के.कुठार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.