ठाणे : ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय भोईर, त्यांची पत्नी उषा भोईर, नगरसेवक देवराम भोईर (वडील) आणि भाऊ भूषण भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर आपण नाराज नाही. मात्र, स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याची कबुली संजय भोईर यांनी दिली. ठाण्यात काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीलादेखील एकामागून एक धक्के बसू लागले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीतून मनोहर डुंबरे, योगेश जानकर, लक्ष्मण टिकमाणी, मालती पाटील, भरत चव्हाण आदींनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पाच विद्यमान नगरसेवकांच्या प्रवेशानंतर आता माजिवडा, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी या पट्ट्यात वर्चस्व असलेल्या भोईर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसला आहे. लोकशाही आघाडीच्या वाटाघाटीत भोईर यांचे वॉर्ड राष्ट्रवादीला सोडले होते, परंतु भोईर कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने आता या ठिकाणी उमेदवार शोधण्यापासून सर्व सोपस्कार राष्ट्रवादीला करावे लागणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर आणि रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत भोईर कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला. >‘विरोधी पक्षनेता म्हणून मान नव्हता’विरोधी पक्षनेतेपद हे केवळ नावापुरते देण्यात आले होते. पक्षात कोणत्याही प्रकारचा मान दिला जात नव्हता. संजय भोईर याला विरोधी पक्षनेता मानायचे नाही, असा सूर पक्षात होता, परंतु शरद पवार यांच्यावर आमची निष्ठा आहे. त्यांनी जेव्हा-जेव्हा आमची साथ मागितली, तेव्हा-तेव्हा ती दिली आहे, परंतु स्थानिक पातळीवरील घाणेरड्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही राष्ट्रवादी सोडली. याशिवाय, अनेक बाबी कारणीभूत ठरल्यानेच शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी सांगितले.>भोईर यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे काहीही नुकसान झालेले नाही. उलट, या भागात नवीन नेतृत्व निर्माण होण्यास मदतच होणार आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस
संजय भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश
By admin | Published: January 17, 2017 6:03 AM