नांदेड :
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला आठवडा लोटला आहे; परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नाही. त्यात बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे मात्र खळबळ उडाली आहे. या पत्रात बियाणींच्या हत्येचा कट परभणीत रचला असून, त्यासाठी नांदेडातील एक दादा परभणीत आला होता, असा हिंदीतून मजकूर आहे. त्यामुळे खरंच हत्येचा कट परभणीत रचला की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुणी हे पत्र पाठविले, याचा तपास सुरू आहे.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर असल्याचे दिसून येते. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीचे विश्लेषण सुरू आहे. त्यात आता बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे निनावी पत्रात? हिंदी भाषेत अन् मोडक्या-तोडक्या शब्दांत हे पत्र आहे. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला आहे. आनंद नगर येथील एक मोठा दादा त्यासाठी परभणीला होता. त्याने अगोदर एकाच्या मुलाला मारले होते. तो मोठा रेती माफिया आहे. बिल्डरच्या कामात कोणी राहू नाही, असा उद्देश होता. असा मजकूर पत्रात आहे. पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न निनावी आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे; परंतु हे पत्र पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्नही असू शकतो. कदाचित पोलीस प्रकरणाचा उलगडा करण्याच्या जवळ पोहोचले असतील, त्यामुळे एखाद्याने हा खोडसाळपणा करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर केला नाही? अशीही शंका घेतली जात आहे.