पुणे /मुंबई : चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांकडून ‘क्लिअरन्स रिपोर्ट’आल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र धामणे यांनी स्पष्ट केले. संजय दत्त सध्या चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आहे. त्याच्या रजेची मुदत गुरुवारी संपली. गुरुवारी दुपारपर्यंत तो कारागृहामध्ये हजर होणे अपेक्षित होते. परंतु मुंबईहून सकाळीच पुण्याच्या दिशेने निघालेला संजय दत्त संध्याकाळपर्यंत पुण्यात फिरून वेळ घालवत मुंबईला परतला. तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत त्याने वाढीव रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. संजयच्या प्रकृतीबाबत मुंबई पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे. मात्र संजय दत्त अन्य कैद्यांप्रमाणे २८ दिवसांपर्यंत कारागृहाबाहेर राहू शकतो असेही धामणे यांनी स्पष्ट केले. संजयच्या रजेवरून गृहमंत्रालय, पोलीस आणि तुरुंग प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येते. रजेची मुदत संपलेली असताना संजय दत्त कारागृहाबाहेर कसा, असे पत्रकारांनी विचारले असता गृह राज्यमंत्री शिंदे म्हणाले, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून कुठलाही कैदी सुटत नसतो. त्यामुळे संजय दत्तला फर्लो मंजूर करणे वा नाकारणे याच्याशी गृहमंत्र्यांचा संबंध नसतो. संजय दत्तच्या फर्लोबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणावर माझे बारकाईने लक्ष आहे. कारागृह प्रशासनाकडून संजयच्या वाढीव रजेच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. गृह विभागाचे सर्व अधिकारी याबाबत नियमांचे पालन करतील. (प्रतिनिधी) गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावासंजय दत्तच्या अभिवचन रजेबाबत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.संजय दत्तच्या फर्लोबाबत नियमानुसारच कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. कोणाला मुद्दाम लक्ष्य करण्याचा वा कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. - देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री
संजय दत्त अजून तुरुंगाबाहेरच
By admin | Published: January 10, 2015 2:16 AM