पुणे : येरवडा कारागृहात तीन वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या कैदी क्रमांक १६६५६ ची गुरुवारी सुटका होणार आहे. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील बंदी अभिनेता संजय दत्त येरवडा कारागृहात याच क्रमांकाने ओळखला जात होता. शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरलेला संजय दत्त उरलेली शिक्षा भोगण्यासाठी १६ मे २०१३ रोजी टाडा न्यायालयाला शरण आला होता़ आर्थर रोडमध्ये १५ दिवस मुक्काम ठोकल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली होती. मात्र, संजय दत्तला धमकी देणारे पत्र आॅर्थर रोड कारागृहाला मिळाले होते़ त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न होता़ तत्कालीन अतिरीक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला २२ मे २०१३ रोजी आर्थर रोड तुरुंगातून मुंबईहून वेगवेगळ्या पाच गाड्यांमधून कडक बंदोबस्तात पुण्याला आणण्यात आले होते. संजय दत्तला पुण्यात हलविले याचे वृत्त बाहेर पडेपर्यंत तो येरवडा कारागृहातील स्वतंत्र खोलीतही पोहोचला होता़ तात्पुरत्या स्वरुपात फाशी गेटाजवळील स्वतंत्र खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला तीन वर्ष घरचे जेवण, गादी-उशी, ओडोमॉस, पंखा अशा सुविधा कारागृहात पुरवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास त्याला नेहमीप्रमाणे नाश्ता देण्यात येणार आहे.त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता आणि कैद्यांच्या सुटकेची असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कारागृहाबाहेर पडेल.
संजय दत्त आज सुटणार
By admin | Published: February 25, 2016 12:38 AM