कोर्टाने फटकारूनही निर्णयाला विलंबमुंबई : फर्लो व पॅरोल रजा मंजूर करताना राज्य शासनाचे सेलीब्रिटी व सामान्य कैद्यांसाठी वेगळे नियम असल्याचे खडेबोल उच्च न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहेत. असे असूनही सेलीब्रिटी असलेल्या संजय दत्तच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी घोळ घातलाच. मुदत संपल्यानंतरही तब्बल दोन दिवस घरी राहून अखेर संजय शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात परतला.गेल्या महिन्यात संजयला १४ दिवसांची फर्लो रजा मिळाली. रजेची मुदत ८ जानेवारीपर्यंत होती. ही मुदत संपण्याआधी संजयने हृदयविकाराची तपासणी व उपचारांची सबब पुढे करीत रजा वाढवून मिळावी, अशी विनंती कारागृहाकडे केली. फर्लो रजेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या कारागृह उप महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी वांद्रे पोलिसांकडून संजयच्या विनंती अर्जावरील शहानिशा अहवाल मागवला. मात्र वांद्रे पोलिसांनी हा अहवाल पाठविण्यास विलंब केला. वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी रात्री ई-मेलने आपला अहवाल कारागृहाला पाठवला. वांद्रे पोलिसांनी संजयला वैद्यकीय चाचण्या व उपचार करायचे असल्याचे नमूद केले. मात्र ही रजा वाढवून द्यावी, अशी शिफारस केली नाही. त्यामुळे आम्ही संजूबाबाचा रजा वाढवण्याचा अर्ज मान्य केला नसल्याचे उप महानिरीक्षक धामणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.संजयचा विनंती अर्ज अमान्य केल्याचे आम्ही वांद्रे पोलिसांना कळवले. त्यांच्याच माध्यमातून ही बाब संजयलाही कळविली गेली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय कारागृहात परतला, असेही धामणे यांनी स्पष्ट केले. संजय हा मुंबईला खोलवर जखमा देणाऱ्या १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेला आरोपी आहे. शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या रजा मंजूर करताना संबंधित पोलीस ठाण्याकडून वेळेत अर्ज मागवावा व ठरावीक वेळेतच या रजा मंजूरही कराव्यात, असे वेळोवेळी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सांगितले आहे. अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईकवर गोळ्या झाडणारा आरोपी रवींद्र शांताराम सावंत याची पॅरोल रजा मंजूर न झाल्याने त्याने नागपूर खंडपीठाकडे यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने शासनाचे नियम हे सेलीब्रिटींसाठी व सामान्य कैद्यांसाठी वेगळे असल्याचे खडेबोल सुनावले होते. असे असताना संजयच्या अर्जावर वेळेत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र त्यात दोन दिवसांची दिरंगाई केली गेली. ही दिरंगाई हेतुपुरस्सर झाल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणी मुंबई पोलीस दलातल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशीही मागणी पुढे येत आहे. (प्रतिनिधी)माध्यमांवर फोडले खापर कारागृहात परतावे लागल्याचे खापर दत्त कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांवर फोडले. संजय व त्याची पत्नी मान्यता या दोघांनीही फर्लो प्रकरणाला प्रसार माध्यमांनी हवा दिल्याचा आरोप केला.
संजय अखेर कारागृहात!
By admin | Published: January 11, 2015 2:29 AM