मुख्यमंत्र्यांना भेटलो तरी काँग्रेसमध्ये जाणारच - संजय काकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:23 PM2019-03-11T22:23:34+5:302019-03-11T22:51:13+5:30
आज संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे संजय काकडे भाजपामध्येच राहणार का? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटलो असलो तरी काँग्रसमध्येच जाणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे कालच निश्चित केले होते. मात्र, आज संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे संजय काकडे भाजपामध्येच राहणार का? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटलो असलो तरी काँग्रसमध्येच जाणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संजय काकडे आणि त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना काँग्रसमध्ये जाणार आहे, याबाबतची माहिती दिली, असे संजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान, संजय काकडे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्वत: सांगितले होते. यावेळी पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ते सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना काकडे यांनी ही माहिती दिली होती. लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे जबाबदारी देतील, ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केले होते. याचबरोबर, मी दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, तसेच मी काँग्रेस पक्षात काम करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांच्याशी बोललो. त्यावर, त्यांनी माझे स्वागत केले असून लवकरच पक्षप्रवेश होईल, असे काकडे यांनी पुण्यात पत्रकारांना बोलताना सांगितले होते.
याशिवाय, मुख्यमंत्री आणि मी यापूर्वीही बोललो आहेत, मी कुठल्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री कायम राहिल. पक्ष वेगळी असतात, पक्षाचे विचार वेगळे असतात, पक्षाची धोरणे वेगळी असतात. सर्व जातीधर्मांचा आदर करुन, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जाणारा एकमेव पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे पक्षाची विचारधारा लक्षात घेऊनच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे संजय काकडे यांनी म्हटले होते. मी कुठल्याही अटी शर्तीविना काँग्रेसमध्ये जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. आदेश दिला तर निवडणूक लढवले, अन्यथा पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल, असेही काकडे यांनी सांगितले.