ठाणे- कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपात गेलेल्या निरंजन डावखरेंसमोर शिवसेनेनं आव्हान उभी केल्याची चर्चा आहे. विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक 25 जून 2018 रोजी होणार आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य मिळाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी झाले होते. त्यांची मुदत येत्या 7 जुलै 2018 रोजी संपत आहे. मात्र, यावेळी निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमाध्ये प्रवेश केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे.शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार रामनाथ मोते यांच्या भाजपा प्रवेशामुळे अॅड. निरंजन डावखरे यांची बाजू मजबूत झाली आहे. माजी आमदार मोते यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग आहे. त्यांनी शिक्षक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रवादीचे कोकण पदवीधरचे आमदार डावखरे भाजपामध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडून डावखरेंना तोडीस तोड ठरेल, अशा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह 4 मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना 31 मे रोजी निवडणूक आयोगानं जारी केली. 7 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 8 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 11 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. 25 जूनला मतदान व 28 जूनला मतमोजणी होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात 97 हजारांपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सर्वाधिक मतदार हे ठाणे व रायगड जिल्ह्यांतील आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेही पदवीधर मतदार या दोन जिल्ह्यांमध्येच आहेत.
शिवसेनेचा भाजपाशी पुन्हा 'पंगा', कोकण पदवीधरचं तिकीट माजी महापौर संजय मोरेंना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 2:04 PM