Sanjay Nirupam vs Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी हायकमांडवर टीका करून पक्षशिस्त मोडल्याबद्दल संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसने निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेसने पाठवलेल्या प्रस्तावावर तातडीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि त्यानंतर पक्षाकडून पत्रक काढून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आला. आता यावर संजय निरुपम यांचे स्पष्टीकरण आले आहे. 'मी आधी राजीनामा दिला, मग पक्षाने माझ्यावर कारवाई केली', असा दावा त्यांनी केला आहे.
निरुपम यांचा ट्विटद्वारे दावा
संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी आज सकाळी X वर लिहिले की, काल रात्री मी माझा दिला. माझ्या राजीनाम्याचे पत्र मिळाल्यानंतर मग काँग्रेस पक्षाने माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. इतकी तत्परता पाहून छान वाटले. फक्त ही माहिती शेअर करत आहे. मी आज सकाळी 11.30 ते दुपारी 12 या वेळेत सविस्तर निवेदन देईन.
निरुपम यांच्यावर कारवाई करण्याचे काँग्रेसने ठरवल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. सी वेणुगोपाल यांच्या सहीचे पत्रक माध्यमांना देण्यात आले होते. त्यात पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल आणि पक्षविरोधी विधाने केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांना तत्काळ प्रभावाने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याला मान्यता दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी दुपारीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निरुपम यांच्यावरील कारवाईवर स्पष्टता दिली आणि निरुपम यांचे नाव स्टार कॅम्पेनरच्या यादीतून हटवले होते.
काय आहे वाद?
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम प्रयत्नशील होते. ही जागा महाविकास आघाडीत आपल्याकडे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र या जागेवर ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यानंतर निरुपम यांनी अमोल किर्तीकरांवर खिचडी चोरीचे आरोप केले. काँग्रेस ठाकरे गटापुढे नरमली आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असं संजय निरुपम बोलले. त्यातून हा वाद निर्माण झाला होता.