ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 28 - भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे टीका करणा-या काँग्रेसच्या संजय निरुपम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. 'संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे,त्याने महाराष्ट्रासाठी काय काम केले? केवळ पद आहे म्हणून त्याचे नाव आहे' असे सांगत त्यांनी निरुपम यांच्यावर तोफ डागली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची छुती युती आहे, अशी टीका संजय निरुपम यांनी केली होती. त्यावर शरद पवार संतापले.
दरम्यान, भाजपा सरकारला राज्यात पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही, हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा गुगली टाकली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 'शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडली नाही तर हा पक्ष सत्तेसाठी काहीही करतो, असा निष्कर्ष लोकांमध्ये जाईल', असा टोलाही शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी युती तुटीची घोषणा केल्यानंतरही शरद पवार यांनी त्यावर कोपरखळी घेत, 'दीर्घकाळापासून असलेली शिवसेना-भाजपातील युती तुटल्याचे मला अतीव दु:ख झाले आहे', असे विधान केले होते. तसेच जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर भाजपाला पाठिंबा देणार का असे विचारले असता, "मी जर तरच्या प्रश्नांना मी उत्तरं देत नाही. त्यांचा एकदा निर्णय झाला की त्यांनी चर्चेला यावे," असे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या या टिप्पणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नव्याच चर्चा सुरू झाली आहे.