मुंबई: आता फक्त शपथच घेतलेली आहे, अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केल्याने वाद निर्माण झाला आहे. तर यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ठाकूर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘या आहेत आमच्या नव्या मंत्री. त्या म्हणत आहेत, आताच शपथ घेतली आहे, खिसा अजून गरम झालेला नाही. असे विधान करुन हे लोक स्वतःसोबतच पक्षाचं नावही बदनाम करत आहेत. हाच दिवस पाहण्यासाठी यांनी पक्षावर सरकार स्थापन करण्यासाठी दबाव टाकला होता का?’ असा सवाल निरुपम यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारांना अनोखा सल्ला दिला होता. आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षावर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे.