मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काळबादेवीतील भीषण आगीत शहीद झालेल्या संजय राणे आणि महेंद्र देसाई या अधिकाऱ्यांच्या कुटुंबाची सोमवारी भेट घेतली. या वेळी कुटुंबांचे सांत्वन करताना तटकरे यांनी देसाई कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. मात्र राणे कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षाने देऊ केलेली १ लाख रुपयांची मदत नाकारली आहे.संजय राणे हे त्यांचे कर्तव्य बजावताना शहीद झाले असल्याने त्याचा कोणताही मोबदला नको असल्याचे राणे कुटुंबाने सांगितले. राणे कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी राणे हे त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. त्याबदल्यात पालिका प्रशासनाकडून मिळणारा पगार समाधानकारक आहे. याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अनेकांनी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशामकाची नोकरी करताना जिवावर उदार होऊन काम करावे लागते, याची कल्पना कुटुंबाला होती. त्यामुळे कोणत्याही पक्षाबाबत नाराजी नसून ज्यांनी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांचे आभारी आहोत. मात्र कोणत्याही पक्षाकडून किंवा व्यक्तीकडून आर्थिक मदत स्वीकारणार नसल्याचे कुटुंबाने स्पष्ट केले. केवळ पर्यायी घराची व्यवस्था होईपर्यंत पालिकेने घर खाली करण्यासाठी तगादा लावू नये, असे आवाहनही कुटुंबाने केले आहे.याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, देसाई आणि राणे कुटुंबाचे पक्षातर्फे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. राणे कुटुंबाच्या भावनांचाही पक्षाला आदर असल्याचे तटकरे म्हणाले. (प्रतिनिधी)
संजय राणे कुटुंबाने नाकारली मदत!
By admin | Published: May 12, 2015 2:33 AM