माजी मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे वृत्त होते. परंतू यावर राठोड यांनी यावर खुलासा केला आहे. आपण उद्धव ठाकरेंना भेटलो नसल्याचे ते म्हणाले.
संजय राठोड आणि मंत्री एकनाथ शिंदे हे वर्षावर जाताना दिसले होते. परंतू राठोड यांनी मी त्या रस्त्यावरून पुढे लिलावती हॉस्पिटलला गेलो, वर्षावर नाही, असे म्हटले. राठोड यांची कार शिंदेच्या ताफ्यासोबत होती. शिंदे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षावर गेले होते. राठोड यांनी याबाबतही खुलासा केला आहे.
मतदारसंघातील कामांसंदर्भात भेटण्यासाठी मी एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी मंत्रालयात आलो होतो. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्र निघालो. मी त्यांच्यासोबत होतो, परंतू पुढे मी लिलावतीला गेलो, असे ते म्हणाले. तसेच मला मंत्रिमंडळात घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, मी राजीनामा दिलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्रिपद गमवावे लागलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा यासाठी बंजारा समाजाकडून २३ एप्रिलला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. यावर राठोड यांनी महंतांची भेट घेऊन समाजाने माझ्या मंत्रिपदासाठी आंदोलन करू नये, असे आवाहन करणार असल्याचे सांगितले.