मुंबई - रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनीच केंद्राला पत्र लिहून बारसू येथील जागा सुचवली होती असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बारसूला लोक विरोध करायला पुढे आलेत त्यामुळे आमच्या दृष्टीने त्या पत्राला किंमत शून्य आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.
आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज
खासदार संजय राऊत म्हणाले की, बारसू प्रकल्पावर पुरेसी चर्चा झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे. नाणार आणि बारसू दोन्ही जागेबाबत भूमिका स्पष्ट सांगितली आहे. लोकांचा नाणारला विरोध होता, लोक नाणारला रस्त्यावर उतरले होते. केंद्राला पर्यायी जागा बारसू होऊ शकते. जिथे माळरान आहे. ते ठाकरेंनी सुचवले होते. पण तिथे लोकांचा विरोध असेल तर उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून पर्यायी जागा सुचवली होती. त्यावेळी विरोध नव्हता. आता लोक विरोध करायला पुढे आलेत. त्यामुळे त्या पत्राला किंमत शून्य आहे. तो शासकीय कागद आहे. शिवसेना लोकभावनेच्या बाजूने आहे. महिला, वृद्ध, तरूण, मुले मरायला तयार आहेत. लाठ्याकाठ्या खायला तयार आहे. त्यामुळे शासकीय कागद फडकावत उद्योगमंत्री सामंत यांनी शहाणपणा करू नये. जागेवर जाऊन लोकांशी बोलावे असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही सर्व विषय लोकांवर सोडला, कोकणात हा पहिला प्रकल्प आहे का? रायगड जिल्ह्यात अनेक केमिकल प्रकल्प उभे आहेत. कुणी विरोध केलेत का? चिपळूणला मोठी एमआयडीसी आहे. कुणी विरोध केला का? युती काळात एनर्जी प्रकल्पाला त्यावेळी विरोध झाला होता. नाणारला विरोध झाला. बाकी कोणत्या प्रकल्पाला विरोध झाला असेल तर त्यांनी सांगावे. केंद्रीय मंत्री कोकणातले आहे. त्यांनी सिंधुदुर्गात कोणते प्रकल्प आणले? फक्त विषारी प्रकल्प आणले असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
मुख्यमंत्री आहेत कुठे?मुख्यमंत्री रजेवर आहेत अशा वृत्तपत्रात बातम्या आहेत. केवळ सामनात नाही तर इतरही आहेत. मुख्यमंत्री रजेवर असल्याचं अधिकृतपणे सीएम कार्यालयातून सांगण्यात येते. इथं कोकणात लोक छातीवर गोळ्या झेलतायेत, मरतायेत. मुख्यमंत्री आहेत कुठे? असा सवाल संजय राऊतांनी करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे पोपट रत्नागिरीत ६ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबत संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया देत ते भाजपाचे पोपट आहेत. पोपट येतात, उडून जातात. पोपट पोपटच असतो, त्यांना सभा घ्यायची ती घेऊ द्या. महाडला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यासाठी सभेला सर्वांनी हजर राहावे असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या सभेवर खोचक टीका केली आहे.