Sanjay Raut slang words bad language: शिवसेनेतील बंडखोर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. तसेच, राऊत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी असेही काहींनी सुचवले. तरीही, राऊत यांच्या वाणीत किंवा शैलीत फरक झालेला नसून आज पुन्हा एकदा त्यांची बोलताना जीभ घसरली. विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून हे *** पक्षातून बाहेर गेले असं त्यांचं म्हणणं आहे, असं वाक्य संजय राऊतांनी उच्चारलं.
नक्की राऊत काय म्हणाले...
"बंडखोर आमदारांनो, कारणं काय देताय? पहिल्या दिवशी म्हणाले की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले की राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते. तिसऱ्या दिवशी म्हणाले उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी म्हणाले की आदित्य ठाकरे कामात ढवळाढवळ करत होते म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी म्हणाले की विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून आम्ही सगळे *** बाहेर पडलो", असे संजय राऊत म्हणाले. या वाक्यानंतर जमलेले अनेक लोक मोठमोठ्याने हसू लागले. मात्र, या मध्ये राऊत यांची आजदेखील जीभ घसरली ही बाब जास्त अधोरेखित झाली.
याआधीही जीभ घसरल्याचे अनेक प्रकार-
संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना राऊत यांनी दोन ते तीन अतिशय वाईट व आक्षेपार्ह शब्द भर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मीडियासमोर वापरले होते. त्यानंतर, बंडखोरांबद्दल बोलताना डेड बॉडी म्हणजे प्रेतांबद्दलचा उल्लेख केला होता. तसेच, बंडखोरांची तुलना शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांशी करत वेश्याव्यवसायबद्दलही विधान केले होते. त्यानंतर राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी अनेकांनी केली. पण तरीही राऊत मात्र आजच्या सभेत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वाक्य बोललेच. त्यामुळे बंडखोर आमदारांची जरी शिवसेनेत परतण्याची इच्छा असली तरी संजय राऊतांच्या अशा विधानाने त्यावर पाणी फेरलं जातंय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसून येत आहे.