Sanjay Raut on Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी फरार असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कोरटकरचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर कोरटकर दुबईला पळाला असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कोरटकर याच्यावर कोल्हापुरात पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून प्रशांत कोरटकर फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहे. मात्र उच्च न्यायालयाने कोरटकरच्या जामिनावर सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे दुबईतील फोटो समोर आले आहेत. यावरुनच संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलला.
"प्रशांत कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे. आता तो पळून गेला की नाही हे देवेंद्र फडणवीस सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो की तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या भाजपच्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. खरोखरच कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो हे करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस इतके सक्षम आहेत की आरोपींना पकडतात. ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात आणि विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात. कृष्णा आंधळे सापडत नाही, कोरटकर सापडत नाही. त्यामुळे हे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि यांना उपचाराची गरज आहे," असं संजय राऊत म्हणाले.
"नागपुरच्या दंगलीतील आरोपींना पकडून रोज पोलीस सांगत आहेत याला पकडलं त्याला पकडलं. पण ज्याला पकडायचं होते तो पळून गेला. ज्या दिवशी प्रशांत कोरटकरला जामीन नाकारला तेव्हा तो नागपुरमध्येच होता. जर तो पळून गेला असेल तर नागपुरच्या पोलीस आयुक्तांची ताबडतोब बदली करायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी यासंदर्भात जबाब दिला पाहिजे," असंही संजय राऊत म्हणाले.