संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:32 PM2023-07-10T12:32:40+5:302023-07-10T12:33:22+5:30
ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.
मुंबई – उद्धव ठाकरेंनी सांगितले भाजपा खोटे बोलतंय. भाजपा वचनापासून मागे फिरली म्हणून राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. आज उभा महाराष्ट्र हे पाहतोय. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी राजकारण केले हा आरोप जे करतायेत ते मातोश्रीच्या बैठकीतही उपस्थित नव्हते. छप्पन, अठ्ठावनकुळे जो आरोप करतायेत तो खोटा आहे. देवीच्या साक्षीने उद्धव ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे. उद्धव ठाकरे खोटे बोलत नाहीत असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, विदर्भात जो प्रतिसाद उद्धव ठाकरेंना मिळतोय तो राज्यातील जनता पाहतेय. अमरावतीत कार्यकर्त्यांची संवाद साधला. आज नागपूरला येतील. त्याठिकाणी विविध ठिकाणाहून कार्यकर्ते येतील. ठाकरे कुटुंबातील लोक सत्तेचे भूकेले नाहीत. ठाकरे कुटुंबाने नेहमी महाराष्ट्र आणि देशाला काहीतरी दिले आहे. पोहरादेवीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.
गुंडगिरी आम्हाला शिकवू नका, समोर या...
अमरावतीत उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडले जातायेत. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण जो राष्ट्रवादीचा गट फुटलायत जे प्रखर हिंदुत्वाला विरोध करत होते त्यांच्यासमोर मुंबईत येऊन करावे. सत्ता आणि पोलीस पाठीशी असल्याने बॅनर फाडले जातायेत. ही गुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये. अमरावतीत त्यांना पुन्हा निवडणुका लढवायच्या आहेत. या बाई पुन्हा लोकसभेत जातील असं वाटत नाही. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडाच शिकवणार आहे. हनुमानाच्या नावाने जी नौटंकी या लोकांनी केली त्यांना कर्नाटकात धडा मिळाला आहे. महाराष्ट्रातही मिळेल. रात्रीच्या अंधारातच पोस्टर्स फाडू शकतात. समोर या मग बघू असं आव्हान राऊतांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिले आहे.
शिंदे गट वैफल्यग्रस्त, अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री
विद्यमान ४ मंत्र्यांना काढून नवीन मंत्री घ्यावेत ही भाजपाची भूमिका आहे. मूळात महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अजित पवारांसोबतच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांत खातेवाटप करण्याची परंपरा आहे. परंतु अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ असे टोलेजंग भाजपामध्ये घेऊनसुद्धा ते ८ दिवस बिनखात्याचे म्हणून बसले आहेत. त्यावरून सरकारमध्ये किती गोंधळ आहे ते दिसते. अजित पवार सध्या बिनखात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. भुजबळ, धनंजय मुंडे, मुश्रीफ हे बिनखात्याचे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार खातेवाटप करू शकत नाही. कारण त्यांच्या सरकारमध्ये असंतोष आणि अराजकता आहे. दबावाची ताकद शिंदे गटात नाही. तेच हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.