मुंबई - साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. करकरेंबाबत साध्वी यांनी केलेले वक्तव ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगत भाजपाने या वक्तव्याबाबत हात झटकले होते. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांची पाठराखण केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. दरम्यान, साध्वी यांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ''हेमंत करकरे हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले हे मान्य आहे. पण साध्वी प्रज्ञा सिंह यांचा तुरुंगात छळ झाला होता. त्यांना तुरुंगात ज्या यातना दिल्या गेल्या, अपमान केला गेला, तो कुठल्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्यामागील त्यांची व्यथा समजून घेतली पाहिजे.''
दरम्याना, सोशल मीडियावरही प्रज्ञासिंह यांच्यावर या वक्तव्याबाबत टीका होत आहे. अशा महिलेला भाजपने निवडणुकीची उमेदवारी दिलीच कशी, असाही सवाल आता विचारला जाऊ लागला आहे आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने मात्र प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याविषयी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही हेमंत करकरे यांना हुतात्माच मानतो. प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. प्रज्ञा सिंह यांचा जो शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे भाजपने म्हटले आहे.