Sanjay Raut Vs BJP PM Modi Govt: मणिपूर हिंसाचार आणि महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यावर ताशेरे ओढले आहेत. यातच आता हरियाणात हिंसाचाराची घटना समोर आली आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, निवडणुका आल्याने प्रत्येक राज्यात पेटवापेटवी सुरू आहे. प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या दंगली होतील. भाजपची निवडणुकी आधी खेळली जाणारी ही जुनी नीती आहे. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. मणिपूरच्या हिंसेप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत
सर्वोच्च न्यायालयानेही मणिपूरबाबत चिंता व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्था आणि अत्याचारावर चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सभागृहात आणि बाहेर हा मुद्दा उठवत आहे. पण आमचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत. जे खासदार मणिपूरला गेले होते. त्यांनाही सोबत घेऊन जाणार आहोत. राष्ट्रपतींना आम्ही मणिपूरची स्थिती सांगू. परिस्थितीचे कथन करण्यासाठी मणिपूरचा लढा संसदेत आणि बाहेर सुरू राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ते रोखायचे आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. पण आहे तो अधिकारही काढून घेत आहे. निवडून दिलेल्या सरकारला काम करू दिले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने काम करू द्या म्हणून सांगितले आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या या हुकूमशाहीला विरोध करणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.