Sanjay Raut on INDIA Vs NDA: लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या विजयामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही करण्यात आली. यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार असल्याचा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन 'इंडिया आघाडी'ची स्थापना केल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २०२४ च्या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी भाजपला आत्मविश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष फोडणे सुरू केले आहेत. पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
मणिपूर संदर्भातील मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी
मणिपूरसारख्या राज्यात चीनचा हस्तक्षेप असल्यामुळे दंगे होत आहेत, असं या देशाचे माजी लष्करप्रमुख समोर येऊन सांगतात. अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की, देशाला मणिपूर संदर्भातील त्यांच्या मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपाडयचा त्यांचे काही ऐकायचे नाही आणि आपला कार्यक्रम रेटायचा, याच्यामुळे देशातील एकंदर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी एखाद्या योद्ध्यासारखी संसदेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राहुल गांधी या प्रस्तावावर काय बोलतात? याच्यावर देशाचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
मूळ एनडीए कुठे आहे?
शिवसेनेतून तुटलेला एक गट, राष्ट्रवादीतून तुटलेला एक तुकडा आणि मग इतर सगळे गोळा केलेले ताकडे-तोकडे जुळवले आहेत, मूळ एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल, जनता दल, एआयडीएम, तृणमूल काँग्रेस या मुख्य पक्षांनी उभा केलेला एनडीए कुठे आहे? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना बैठक घेऊ द्या, पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, तो इतिहासातील सर्वांत मोठा पराभव असणार आहे, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.