Sanjay Raut Eknath Shinde, Ayodhya Visit: बेईमान आणि गद्दार आमदारांना जी सुरक्षाव्यवस्था दिली ती कुठल्या मुद्द्यावर दिली? जर तुम्ही इमानदार आहात तर घाबरता कशाला? सुरक्षा कशाला घेता? एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा म्हणजे रामलल्लाचं दर्शन नाही, ते तर शक्तीप्रदर्शन होतं, असा सणसणीत टोला शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे बहुतांश आमदार रविवारी अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लाखो शिवसैनिकही अयोध्येत दाखल झाले होते. त्यांनीच शिंदे-फडणवीस जोडीचे दिमाखात स्वागत केले. त्यावेळी मोठा जनसमुदाय महायुतीच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळाले. त्यावरूनच संजय राऊतांनी 'शक्तिप्रदर्शन'वाला खोचक टोमणा मारला.
"दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही सुद्धा या आधी दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी कालची टोळी देखील होती. ज्या रामाची आपण पूजा केली त्या रामाने वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं आणि राज्य चालवताना भरताना रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार अमलात आणले. हा विचार किती लोकांना पटतो आणि पटला आहे मला माहित नाही. शक्ती प्रदर्शन ठाण्याच्या नाक्यावर देखील होऊ शकते. विमानाने गुंड घेऊन गेला होतात त्यांना शरयू तीरावर पवित्र करण्यासाठी घेऊन गेला होतात का?" असा सवाल त्यांनी केला.
"सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अयोध्येत आहेत. श्रद्धा असेल तर आयोजित जाण्याला काही हरकत नाही. परंतु शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत. एक मोठा गट या दौऱ्याला गेला नाही. तो अस्वस्थ आहे. काहीतरी गडबड सुरू आहे. ती काय गडबड आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. त्यावर आम्ही काल देखील प्रश्न उपस्थित केला होता.